मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झाले असले, तरी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील बड्या नेत्यांमध्ये खातेवाटपाच्या मुद्द्यावरून अस्वस्थता आहे.

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीला अखेर अंतिम स्वरूप देऊन आता मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले असले, तरी काँग्रेसमधील खदखद अजूनही संपायला तयार नाही. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देताना अमिन पटेल यांना डावलण्यात आले असून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देताना उत्तर भारतीय आणि सुन्नी समाजाचा आहे, हा निकष लावण्यात आल्यानेच अमिन पटेल यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे समजते.

धर्मनिरपेक्षतेचे रात्रंदिवस धडे देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने असा निकष लावल्याने विचारधारेपायी या पक्षात सक्रिय झालेले अनेक नवे तरुण संभ्रमात पडले आहेत. काँग्रेसच्या यादीत घराणेशाही हादेखील निकष प्रामुख्याने लावण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा नावाखाली अमित देशमुख, विश्वजित कदम अशा काँग्रेसमधील दिग्गजांच्या मुलांची वर्णी लावली गेली.दुसरीकडे, विदर्भातील मंत्र्यांना खातेवाटप करतानाही अनेक रुसव्या-फुगव्यांना काँग्रेस नेत्यांना सामोरे जावे लागले आहे. नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम खाते हवे होते. मात्र महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे गेल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम हे खाते अशोक चव्हाण यांना द्यावे लागले. त्यामुळे नाराज राऊत यांना मग ऊर्जा खाते द्यावे लागले. त्यामुळे पाचव्यांदा आमदार झालेले सुनील केदार यांची दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्यावर बोळवण करावी लागली.

संग्राम थोपटे यांची नाराजी तर संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिली. संपूर्ण पुणे जिल्ह्यात एका बाजूला राष्ट्रवादी व दुसऱ्या बाजूला शिवसेना, भाजप यांचे आव्हान पेलत थोपटे यांनी एक हाती काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवूनही त्यांना त्याच त्याच घराण्यांमुळे संधी नाकारण्यात आल्याने तेही प्रचंड नाराज झाले आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील कैलास गोरंट्यालही प्रचंड नाराज झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकाळ ‘सुकर’ नाहीच?

या सर्व पार्श्वभूमीवर, येणाऱ्या काळात केवळ सत्ता आली, मंत्रिमंडळ झाले आणि खातेवाटप उरकले म्हणून या सरकारचा कार्यकाळ फार सुकर राहील, असे चित्र बिलकूलच नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासगीत कबूल करत आहेत.

राष्ट्रवादीतही धुसफूस

राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील खात्यांच्या वाटपाबाबत ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले गृह खाते आपल्या पदरात पडावे, यासाठी ज्येष्ठ मंत्री इच्छुक होते. अजित पवार यांची हे खाते मिळावे अशी इच्छा असूनही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ते जाईल, असा कयास होता. मात्र गृह खाते घेण्यास कोणी राजी नव्हते असे सांगत, शरद पवार यांनी गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सल्ल्यावरूनच अनिल देशमुख यांच्याकडे दिली. एकंदरच खाते वाटपावर जयंत पाटील यांचा वरचष्मा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादीचा जनाधार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आहे. विदर्भात राष्ट्रवादीला अजूनही दमदार कामगिरी करता आलेली नाही. पण मोठ्या नेत्यांच्या भांडणात गृह खाते हे विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडे कसे जाईल, याची रणनीती यशस्वी करण्यात जयंत पाटील यांचा समर्थक गट यशस्वी ठरला आहे. शहरी भागातील घरांच्या प्रश्नांबाबत गृहनिर्माण विभाग हा महत्त्वाचा असून, ते खाते जितेंद्र आव्हाड यांच्या पदरात टाकण्यात जयंत पाटील समर्थक यशस्वी ठरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात, खासकरून कोल्हापुरात भाजपशी एकहाती संघर्ष करणारे हसन मुश्रीफ यांना ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे, हा एकमात्र अपवाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेले ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. गेली पाच वर्षे राष्ट्रवादीच्या बाजूने प्रसारमाध्यमांमध्ये किल्ला लढविणारे नवाब मलिक यांनी दारू अथवा मद्यार्क यांच्याशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभाग नको, अशी मागणी केली होती. त्यांना कमी महत्त्वाचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता हा विभाग देण्यात आला. मलिक यांना कामगार विभाग हवा होता. पण कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या फळीतील राज्यमंत्री संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, अदिती तटकरे, दत्तात्रय भरणे यांना चांगली खाती मिळाली आहेत. कराडच्या बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून सहकार व पणन हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. राजेंद्र शिंगणे यांना अन्न व औषध प्रशासन, तर राजेश टोपे यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागावर समाधान मानावे लागले आहे.

जयंत पाटील यांचा वरचष्मा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील खातेवाटपात शरद पवार यांनी धक्कातंत्र अंवलंबिले आहे असे बोलले जात असले, तरी या खातेवाटपावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वरचष्मा असल्याची राष्ट्रवादीत चर्चा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here