सातारा : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका विवाहितेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गळा दाबून तसेच डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वनवासमाची (ता. कराड जि. सातारा) येथे मंगळवार दि. ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

लता मधुकर चव्हाण (वय ४५ वर्ष) (रा. वनवासमाची ता. कराड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लता चव्हाण मंगळवारी गावानजीकच्या डोंगरावर जळण आणण्यासाठी गेल्या होत्या. परंतु, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नसल्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान, डोंगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास शोध मोहिम सुरू असताना लता चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली.

सहा दिवसांपूर्वी दुसरं लग्न, २६ वर्षीय गे पार्टनरकडून हत्या, बिझनेसमनच्या खुनाचं गूढ उकललं
घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.

रात्रीचं इडली सांबार जीवावर बेतलं, नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू
संशयित पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने डोंगर परिसरात जनावरे चारण्यासाठी, जळण आणण्यासाठी आणि शेतशिवारामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या भव्य होळीने सैलानी बाबा यात्रेला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here