मुंबई :
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ४,६४० घरे आणि १४ भूखंडांच्या विक्रीसाठीच्या सोडत अर्ज नोंदणी प्रक्रियेस बुधवारपासून प्रारंभ झाला. म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांच्या उपस्थितीत या सोडत प्रक्रियेस प्रारंभ झाला. ऑनलाइन संगणकीय असणारी ही सोडत १० मे रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल. म्हाडाने नव्याने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीनुसार ही सोडत प्रक्रिया होणार आहे. यानुसार अर्जांच्या नोंदणीवेळीच अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तपासली जाईल. त्या चाळणीत सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, पहिल्याच दिवशी सायंकाळी ६.४९ पर्यंत ३७९ अर्ज दाखल झाले आहेत.
सोडतीतील पात्र अर्जांची अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १० मे रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाईल. अर्जदारांना सोडतीचा निकाल मोबाइल फोनवर एसएमएस, अॅप, इ-मेलद्वारे त्वरित कळवला जाईल.
१४ भूखंड, १५३ सदनिका विक्रीसाठी
या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ घरे, २० टक्के योजनेतील १,४५६ घरे उपलब्ध आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार २०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील. अर्जदारांसाठी ०२२ -६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.