या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तक्रारदार कृणाल अरविंद पटेल (वय ३९) हे कुटुंबासह भिवंडी शहरातील कासार आळीमधील आनंद नगर भागात राहतात. तर आरोपी शिक्षिका ही गोकुळनगर भागातील नालंदा इमारतीत घरातच खासगी शिकवणीचा वर्ग घेते. या वर्गात तक्रारदार पटेल यांची दोन मुलं शिक्षण घेत आहेत. त्यातच ३ मार्चला संध्याकाळच्या सुमारास दोन्ही मुलं शिकवणीसाठी गेले होते. त्यावेळी शिक्षिका दीपा अग्रवाल हिने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दोन्ही मुलं देऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही मुलांना शिकवणी वर्गातच अमानुषपणे मारहाण केली. अंगावर वळ येईपर्यंत ही मारहाण करण्यात आली.
मारहाणीचे चित्रीकरण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दोन्ही मुलं एक मुलगा आणि एक मुलगी घरी गेल्यानंतर त्यांच्या अंगावर मारहाणीमुळे काळे निळे लाल चट्टे पडल्याचे आईला दिसले. त्यांनी तातडीने दोघांवर औषध उपचार केले. मात्र दोन्ही मुलं मारहाणीमुळे एवढे भयभीत झाले होते की त्यांनी पुन्हा शिकवणी वर्गात जाण्यास भीती व्यक्त केली. दरम्यान, इमारतीमधील एका रहिवाशांनी मुलांसोबत घडलेल्या अमानुष मारहाणीचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
मुलांचे पालक कृणाल पटेल यांनी त्यानंतर ४ मार्चला निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात भादंवि कलम (मुलांची काळजी व संरक्षण ) २०१५ चे कलम ७५ प्रमाणे आणि ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.