श्रीमंतांच्या यादीत अदानींची उडी
शेअर्समधील तेजीचा फायदा गौतम अदानी यांनाही झाला असून गेल्या दहा दिवसांत त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत झपाट्याने प्रगती केली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार अदानी सध्या ५४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २२व्या क्रमांकावर झेपावले आहेत. नुकत्याच सकारात्मक हालचालींमुळे समूहाच्या शेअर्सनी देखील लक्षणीय झेप घेतली आहे. गेल्या २४ तासात गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.९७ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
महिनाभर शेअर्समध्ये पडझड
२४ जानेवारी रोजी अमेरिकन रिसर्च कंपनी, हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत आपला अहवाल प्रकाशित केला आणि दुसऱ्याच दिवशी अदानीच्या साम्राज्याला सुरुंग लागला. हिंडेनबर्गच्या अहवालाने बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम केल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. यामुळे महिन्याभरात अदानीचे शेअर्स ८५ टक्केपर्यंत घसरले आणि समूहाचे बाजार भांडवल १२ लाख कोटींनी घसरून $१०० अब्जच्या खाली पडले.
बुधवारी शेअर्सची स्थिती
गेल्या बाजार सत्रात समूहाच्या सर्व १० सूचीबद्ध कंपन्यांचे वाढीसह क्लोज झाले. तर ५ शेअर्सना अप्पर सर्किट लागले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक जवळपास ३% वाढून क्लोज झाला, तर इतर पाच शेअर्स ५% अप्पर सर्किटला धडकले. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे.