मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, अंगणवाडी सेविकांसाठी अनेक घोषणांची लयलूट केली. राज्यातील गरीब नागरिकांच्यादृष्टीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. त्यानुसार सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वस्वीपणे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एका आर्थिक वर्षात नागरिकांना रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील. Maharashtra Budget: देवेंद्र फडणवीसांकडून ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा, १८ व्या वर्षी मुलींना मिळणार ७५ हजार विशेष गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत २०० नवीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचार घेण्यासाठीच्या रुग्णालयांच्या पर्यायांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून चार लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु होणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.