या प्रकरणाची कारवाई करत असलेले एसपी राजकुमार चौधरी यांनी सांगितले की, २ मार्चला पुरणचंद किराड यांनी शहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांची सून उर्मिला हिने मोराई येथे राहणाऱ्या मुकेश गुर्जर आणि दिलीपसोबत मिळून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून त्यांना बेशुद्ध केलं.
सासू सासरे बेशुद्ध झाल्यानंतर या सुनेने सासूचे मंगळसूत्र, चांदीच्या ३ जोडी पैंजण, सोन्याचा हार, सोन्याची बांगडी, सोन्याचे कानातले, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून प्रियकरासह पळ काढला. सासऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सून आणि तिच्या प्रियकराविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपींनी स्टेशन ऑफिसर किरदार अहमद यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. याप्रकरणी पोलीस पथकाने आरोपी सून उर्मिला धाकड आणि मुकेश गुर्जर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी त्यांचा कसून तपास केल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी सून उर्मिला धाकडकडून २ जोडी चांदीची पैंजण, कानातले, १ जोड सोन्याची अंगठी, सोन्याचे मंगळसूत्र आणि २५०० रुपये असा ऐवज जप्त केला आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. पण, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.