करोनाने जगभरात थैमान घातले आहे. क्रिकेटलाही करोनाचा मोठा धक्का बसला आहे. आता करोनामुळे भारतातील एक ट्वेन्टी-२० लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. आता ही लीग पुढच्या वर्षीच खेळवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.

करोनामुळे भारतीय क्रिकेटलाही मोठा धक्का बसला आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लीग रद्द करावी लागली होती. त्यानंतर भारताने श्रीलंका आणि झिम्बाब्वेचा दौराही रद्द केला होता. त्यानंतर आशिया चषक स्पर्धाही बीसीसीआयने रद्द केली होती. आता भारतातील ट्वेन्टी-२० लीगही करोनामुळे पुढे ढकलावी लागली आहे.

यावर्षी आयपीएल भरवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसलेली पाहायला मिळते. यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार आहे. पण भारताला युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी अजूनही महत्वाची परवानगी मिळाली नसल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता आयपीएलचे काय होणार हादेखील प्रश्न आहे.

भारतामध्ये एक ट्वेन्टी-२० लीग सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, ती म्हणजे तामिळनाडू प्रीमिअर लीग. आतापर्यंत या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूही खेळले होते. गेली पाच वर्षे या लीगचे यशस्वीपणे आयोजनही करण्यात आले होते. पण यावर्षी करोनामुळे ही लीग पुढे ढकलण्यात आली आहे. ही लीग ऑगस्ट आणि सप्टेंबर किंवा नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार होती. पण या वर्षी करोनामुळे ही लीग होऊ शकत नाही, असेच चित्र आहे.

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी सांगितले की, ” तामिळनाडी प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु करण्यासाठी आम्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून सप्टेंबरपर्यंतचा विचार करत होतो. ही स्पर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात घेण्याचा आमचा मानस होता. पण करोनाचे संकट पाहता आम्ही या महिन्यांमध्ये ही स्पर्धा न खेळवण्याचा विचार केला आहे.”

यावर्षी आता तामिळनाडू प्रीमिअर लीग होऊ शकणार नाही, असे संकेत मिळत आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी मार्च महिन्यात ही लीग खेळवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण त्यासाठी देशातील करोनाच्या परिस्थितीवर तामिळनाडू क्रिकेट संघटनेला लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण करोनाचं संकट कमी झाल्यावरच त्यांना ही लीग खेळवता येऊ शकते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to เบอร์สวย Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here