सीएसजीची बैठक २८ जुलैला झाली. या बैठकीत पूर्व लडाखमधील स्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. लडाखमधील फिंगर भागासह सीमेवरील तणावाच्या इतर ठिकाणांहूनही चिनने सैनिक पूर्णपणे मागे हटवावेत, यावर भारत ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे.
भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चेत सीमेवर सैनिक वाढवल्याच्या मुद्दा भारताने उपस्थित केला नाही. कारण भारतानेही पूर्व लडाखमध्ये सीमेवर ४० हजार जवान तैनात केले आहेत. तर चीननेही सीमेवर जवळपास ४० हजार सैनिक तैनात केल्याचं सांगण्यात येतंय.
लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चीनशी चर्चेदरम्या काय मुद्दे उपस्थित करावे आणि चीनने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काय भूमिका घ्यावी यावर सीएसजी ही मार्गदर्शन करत असते. सीएसजी ही सरकारमधील उच्च स्तरावरील सर्वात एक मोठी अभ्यास समिती आहे. भारतीय सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केल्याने भारतीय लष्करानेही आपली माउंट डिव्हीजन सीमेवर दोन महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरयाणातून माउंट डिव्हिजनच्या जवानांना सीमेवर तैनात केले गेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.
चिनी सैनिकां इतकेच भारतीय जवानही सीमेवर तैनात आहेत. आणखी सैनिक तैनात करण्याची घाई भारताने केलेली नाही. दोन्ही देशातील सैन्यामध्ये कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीत सैनिक मागे हटवण्याबाबत चीनने दिलेला शब्द पाळावा, अशी भारताची मागणी आहे. ही बैठक १४-१५ जुलैला झाली होती.
चर्चेनंतर फिंगर भागातून सैनिक मागे घेण्यासाठी प्रक्रिया चीनने सुरू केली होती. मात्र त्यानंतर पुढच्या दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया थांबली आणि तेव्हापासून चिनी सैनिक तिथे ठाम मांडून आहेत. दोन-तीन महिन्यानंतर हिवाळा सुरू होणार आहे. पूर्व लडाखसह हिमालयात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असते. या पार्श्वभूमीवर भारताने दीर्घ कालीन लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हिवाळ्यासाठी लष्कराने जवानांसाठी मोठ्या प्रमाणावर कपडे आणि इतर गरम वस्तूंचा साठा सुरू केला आहे. जगातील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियर या तळासाठीची तयारीही लष्कराने सुरू केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times