Sadanand Kadam Arrested by ED | दापोलीच्या साई रिसॉर्टप्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात. ईडी पुढे काय करणार?
हायलाइट्स:
- ईडीने सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे
- ईडीने याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही
- अनिल परबांच्या अडचणीत वाढ
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून साई रिसॉर्टप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. आज पहाटे ईडीचे पथक सदानंद कदम यांचे वास्तव्य असलेल्या दापोलीतील कुडेशी या गावात पोहोचले. याठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही काळ सदानंद कदम यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीचे पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासोबत सातत्याने सदानंद कदम यांचे नाव जोडले जात होते. याप्रकरणात आता त्यांना ताब्यात घेतल्याने ईडीच्या कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर कारवाईला वेग?
सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा कारणीभूत ठरल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेच्या आयोजनासाठी सदानंद कदम यांनी आर्थिक रसद पुरवल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच सदानंद कदम यांच्याविरोधातील कारवाईला वेग आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सदानंद कदम हे दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टचे मालक आहेत. त्यांचे अनिल परब यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. आता ईडीने सदानंद कदम यांना अटक केली असल्यास त्यांच्या चौकशीतून आणखी कोणती नवी माहिती पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.