रवी राऊत, यवतमाळ : सुमारे दीड वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील एका प्रेमी युगुलाने गावातून पलायन केले होते. त्यानंतर त्यांचा आजतागायत कुठलाही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना लागला नव्हता. मात्र गुरुवारी सकाळी दाभडी येथील जंगलात एक व्यक्ती मोहोळ झाडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला काही संशयास्पद वस्तू आढळल्या. त्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर प्रेमी युगुलाचे जंगलात मृतदेह आढळल्याच्या चर्चेने संपूर्ण तालुकाच ढवळून निघाला. मात्र, कुठलाही मृतदेह तेथे आढळला नाही. परंतु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कपडे, चप्पल, दात आणि हाडाचे अवशेष जप्त केले आहे.

दाभडी येथील एका तरुणाचे आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, कुटुंबीय या लग्नाला होकार देणार नाहीत, अशी भीती त्यांना होती. त्यातूनच दीड वर्षांपूर्वी त्या प्रेमी युगुलाने गावातून पलायन केले. या घटनेची नोंदही त्यावेळी पोलिसांनी घेतली होती. असे असले तरी आजतागायत त्या प्रेमी युगुलाचा कुठलाही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना नाही.

दरम्यान, गुरुवारी सकाळी दाभडीच्या जंगलात प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ही चर्चा कानी पडताच ठाणेदार श्याम सोनटक्के हे पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची आणि आसपासच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. मात्र, तेथे कुठलाही मृतदेह आढळून आला नाही. असे असले तरी तेथे कुजलेल्या अवस्थेतील कपडे, मोबाईल, हाडाचे बारीक तुकडे, दातांचे तुकडे, केस अशा संशयास्पद बाबी आढळून आल्या.

या गंभीर बाबीची माहिती मिळताच दारव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे देखील तेथे पथकासमवेत दाखल झाले. त्यांच्या समक्ष पोलिसांनी संशयास्पद बाबींचा पंचनामा केला. तसेच ते अवशेषही जप्त करण्यात आले. आता ते अवशेष प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविणार असल्याची माहिती एसडीपीओ मिरखेलकर यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे, फौजदार शिवराज पवार, बाबाराव पवार, जमादार सतीश चौधर, मुनेश्वर, शिपाई मिथून चव्हाण, मनोज चव्हाण, योगेश संकुलवार आदी उपस्थित होते.

सांगलीला निघताना मुंबईत नवऱ्याला लुटलं, बॉयफ्रेण्डसोबत छू व्हायला ९ महिने थांबली, कारण…

वडिलांनी पटवली कापडांची ओळख

दाभडीच्या जंगलात आढळून आलेले कपडे हे पुरुषाचे होते. शिवाय, प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळल्याची चर्चा असल्याने ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी त्या तरुण-तरुणीच्या नातेवाईकांना तेथे पाचारण केले. यावेळी त्या तरुणाच्या वडिलांनी घटनास्थळी आढळलेला मोबाईल, कपडे, चप्पल त्याचीच असल्याची ओळख पटविल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्या तरुणाचा कुणी घातपात तर केला नसावा ना, या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती आहे.

हळदीच्या दिवशी ‘नवरी’ प्रियकरासह पळाली, फिनेल पिऊन पोलिसात गेली, विदर्भात खळबळ

फॉरेन्सिक अहवालाकडे गावकऱ्यांच्या नजरा

सुमारे दीड वर्षांपासून गावातून पलायन केलेले प्रेमी युगुल बेपत्ता आहे. आजतागायत त्यांचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यातच दाभडीच्या जंगलात आढळून आलेला मोबाईल, कपडे, चपला या वस्तू मुलाच्याच असल्याची खात्री त्या तरुणाच्या वडिलांनी पटविली. त्यामुळे आता संशयाला वाव आहे. परिणामी, पोलिसांनी त्या वस्तू जप्त केल्या असून, फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. आता फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात काय निष्पन्न होते, याकडे प्रेमी युगुलाच्या कुटुंबाच्याच नव्हेतर दाभडी येथील गावकऱ्यांच्याही नजरा लागल्या आहे.

ठाकरे-राणे यांची एकाच दिवशी विधानभवनात एंट्री; राणे म्हणाले, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here