मक्तेदारी व्यवसाय
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरले, पण काही काळानंतर आता घसरणीचे काहीच कारण नाही, असे दिसू लागले. कारण काही कंपन्यांचा व्यवसाय विशेषत: अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर आणि अदानी ग्रीन एनर्जीचा व्यवसाय खूपच मजबूत आहे. अदानी समूहाचा भारतात २५ टक्क्यांहून अधिक बंदरांचा (पोर्ट्स) व्यवसाय आहे, तर या क्षेत्रात कंपनीची स्वतःची मक्तेदारी आहे. याशिवाय हरित ऊर्जा क्षेत्रातील इतर कंपन्याही प्रवेशासाठी जागा शोधत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी देखील त्याच्या क्षेत्रातील एक मोठी कंपनी असून व्यवसाय १२ राज्यांमध्ये पसरलेला आहे. अशा व्यवसायामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अदानी समूहावर परतला आहे.
रेटिंग एजन्सींचे सहकार्य
संकट काळात अदानी समूहाला अनेक रेटिंग एजन्सींचा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा समूहाप्रती विश्वास वाढला. विशेषत: फिच आणि मूडीजच्या अहवालांनी अदानी समूहाला मोठा दिलासा दिला. फिच रेटिंग्सने सांगितले की, शॉर्ट सेलरचा अहवाल असूनही अदानी ग्रुप बऱ्यापैकी स्थिर आहे आणि त्याच्या युनिट्स व सिक्युरिटीजवर या अहवालाचा त्वरित परिणाम होणार नाही. याशिवाय फिच रेटिंग्सने म्हटले की, अदानी ग्रुपमध्ये पैसा गुंतवळलेय भारतीय बँकांना कोणताही मोठा धोका नाही, कारण बँकांनी अदानी समूहाला फारसे कर्ज दिलेले नाही.
एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांचे स्टेटमेंट
दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) अदानी समूहाबाबत विधान जारी केले आणि म्हटले की त्यांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांना सुमारे २७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे, जे एकूण कर्जाच्या केवळ ०.८८% आहे. त्याचवेळी बँक ऑफ बडोदाने म्हटले की, गेल्या दोन वर्षांत त्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांचे कर्ज कमी केले आहे.
वेळेआधीच कर्जाची परतफेड
गुंतवणूकदारांचा विश्वास परत जिंकण्यासाठी अदानी समूहाने वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली. या आठवड्यात, त्यांनी सुमारे रु ७,३७४ कोटी ($९०१ दशलक्ष) शेअर-आधारित वेळेपूर्वीच फेडले आहे, असे अदानी समूहाने निवेदन जारी केले. यापूर्वी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने SBI म्युच्युअल फंडाला १ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली होती. यासोबतच उर्वरित कर्जही वेळेपूर्वी फेडण्यात येईल, असे अदानी समूहाचे म्हटले.
अमेरिकेतून मोठी गुंतवणूक
आठवडाभरापूर्वीच अदानी समूहात अमेरिकन कंपनीने मोठी गुंतवणूक केली. अदानी समूहाकडून सांगण्यात आले की GQG इन्व्हेस्टमेंट फर्मने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमधील भागभांडवल खरेदी केले. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या मजबूतीने वाढ झाली. GQG पार्टनर्सनी अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेस या चार अदानी समूहातील १५,४४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
जगभरात अदानी ग्रुपचा रोड शो
हिंडेनबर्गच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करताना अदानी समूह पुन्हा आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी अनेक देशांमध्ये रोड शो आयोजित करत आहे. याद्वारे, समूह गुंतवणूकदारांना खात्री देऊ इच्छितो की त्यांच्या कंपन्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. फेब्रुवारीमध्ये, समूहाने सिंगापूरमध्ये निश्चित-उत्पन्न-रोड शो केला, जो यशस्वी झाला. यानंतर कंपनीने ही मालिका पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सद्य अदानी समूह या महिन्यात लंडन, दुबई आणि अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये रोड शो आयोजित करणार आहे.