मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संतोष नगर झोपडपट्टी संकुलात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली, त्याच्यावर दोघांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ जखमी मोहम्मद सोहेल मोहम्मद शकील याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून जाताना दिसले. संशयास्पदरीत्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. सुरुवातीला आरोपींनी त्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली असता दोघांनीही हल्ल्याची कबुली दिली.
तरुणीबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीशी लग्न करण्याच्या वादातून हा हल्ला झाला. जखमी सोहेलचे एका तरुणीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. म्हणून चार वर्षांपूर्वी त्याने मुलीला आपल्या घरी आणले होते. दरम्यान, तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी शोएब अन्सारीशी भेट झाली. हळूहळू त्यांच्या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, याची कुणकुण सोहेललाही लागली. यावरून सोहेल आणि शोएबमध्ये अनेकदा वाद झाला होता. आरोपीने सोहेलला मुलीपासून दूर राहण्याची सूचना केली होती, मात्र त्याने नकार दिला. यावरून दोन दिवसांपूर्वी सोहेलचे आरोपींसोबत भांडण झाले होते.
सोहेलला बोलावले आणि चाकूने वार केले
गुरुवारी आरोपी शोएबने सोहेलला फोन करून प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने त्याला भेटण्यासाठी संतोष नगर झोपडपट्टीत बोलावले. सोहेल त्याच्या दुचाकीवरून तेथे पोहोचताच मागून येणाऱ्या दोन्ही आरोपींनी त्याला आधी अडवलं आणि खाली उतरताच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सोहेल गंभीर जखमी झाला. सोहेल मेला असा विचार करून दोघेही तेथून पळून गेले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.