म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत असतानाच शनिवारी कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक संतोष गायकवाड यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. संभाजीनगर प्रभागातून निवडून आलेले गायकवाड हे उत्कृष्ठ फुटबॉलपटू होते. दरम्यान, दिवसभरात आणखी सहा जणांचा करोनाने बळी घेतला असून २६३ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात करोना संसर्गाचा आकडा रोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कडक लॉकडाऊन करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे. वारे वसाहत परिसरात हॉटस्पॉट तयार झाला असून काही दिवसापूर्वी गायकवाड यांचे वडिल करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नगरसेवक गायकवाड यांनाही करोनाची लक्षणे दिसत असूनही त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केले. यातूनच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

करोना चाचणीचे दोनपैकी एक यंत्र गेले तीन दिवस बंद आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. एका यंत्रावर सध्या तपासणी सुरू असून शनिवारी दिवसभरात २६३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आकडा ६४४३ पर्यंत पोहोचला आहे. मृत्यूचा आकडा दोनशेच्यावर गेला आहे.

सध्या दोन हजार रूग्णांची करोना तपासणी होत असून त्यामध्ये वाढ करत ते पाच हजारापर्यंत करण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तपासणी झाल्यास संक्रमण थांबविता येईल. जिल्ह्यामध्ये ३८०० रॅपिड ॲन्टीजेन टेस्टींग किट्सचे वाटप करण्यात आले असून बुधवारपर्यंत 20 हजार किट्स उपलब्ध होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here