पुणे : पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असून, सायंकाळी सहा ते रात्री नऊ आणि पहाटे दोन ते पाच या वेळांत प्राणांतिक अपघातांची संख्या जास्त असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अपघातप्रवण क्षेत्रांचे ‘जिओटॅगिंग’ करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती ‘आरटीओ’ने दिली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षाअंतर्गत इतर कार्यालयांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना; तसेच प्रबोधनपर कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या वेळी पुणे जिल्ह्यातील अपघाताचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या व मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. केवळ दुचाकी अपघातांचे व पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण एकूण अपघातांच्या ९० टक्के आढळून आले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर तालुका, जुन्नर तालुका येथे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
‘आरटीओ’कडून रस्ता सुरक्षा प्रबोधन
आरटीओ कार्यालयाने तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षिक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची अपघात रोखण्यासाठी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून रस्ता सुरक्षा प्रबोधन करणे व त्या दृष्टीने वाहन तपासणी केली जात आहे. त्याबरोबरच अपघात प्रवण क्षेत्राचे ‘जिओटॅगिंग’ या कार्यालयाकडून केले जात आहे. ‘जिओटॅगिंग’ झाल्यानंतर अपघातप्रवण क्षेत्रातील उपाययोजना संबंधित विभागाला कळविण्यात येणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराचे पत्र
सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट परिधान करूनच कार्यालयाच्या आवारात प्रवेश करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ‘आरटीओ’कडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महाविद्यालय, बँक इत्यादी विभागांनी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापर करण्याबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.
जिल्ह्यातील अपघात
जानेवारी २०२२
वेळ मृत्यू जखमी अपघात
दिवसा ३८ ४३ ८८
रात्री ५० ३२ १०२
जानेवारी २०२३
वेळ मृत्यू जखमी अपघात
दिवसा ५० ८८ १६६
रात्री ५४ ६८ १४५