भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमास जास्त फटका बसलेला नाही; पण अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दीर्घ प्रतिक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमसीसीची झालेली बैठक मोलाची आहे. ‘विविध देशातील फ्रँचाइज स्वरुपाच्या लीगमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम भरगच्च झाला आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संरक्षण कसे करता येईल, त्यांचे कसे सुरळीत संयोजन होईल, हाच दुबईतील बैठकीचा मुख्य उद्देश आहे’, असे एमसीसीने आवर्जून नमूद केले आहे. त्याचवेळी दहा वर्षांनी क्रिकेटचे स्वरुप कसे असेल, याचाही या बैठकीत विचार होणार आहे.
नव्या २०२३ या वर्षात फ्रँचाइज संघांच्या लीग जास्त आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींचा कार्यक्रम झाकोळला आहे. यंदाच्या वर्षात केवळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लीग नाहीत. याच कालावधीत भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे, याकडे एमसीसीने विशेष लक्ष वेधले आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा कालावधी सोडल्यास सातत्याने लीग होत आहेत. हेच जवळपास प्रत्येक वर्षी दिसत आहे. आयपीएलच्या कालावधीतच लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकाचवेळी नसते. मात्र अन्य लीग होत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही होत असतात. नव्या आंतरराष्ट्रीय मालिका कार्यक्रमात छोट्या देशांना फारसे सामने खेळण्याची संधीच मिळालेली नाही. यापूर्वीही सर्वांना समान संधी नव्हती हे खरे असले, तरी क्रिकेटमध्ये येत असलेल्या पैशाचा आयसीसीच्या प्रत्येक संलग्न देशाला फायदा होण्याची गरज आहे, असेही एमसीसीने म्हंटले आहे.
तूर्तास महिलांचे सामने सुरळीत
महिला क्रिकेटच्या लढती आंतरराष्ट्रीय मालिका कार्यक्रमानुसार होत आहेत, पण भविष्यात आंतरराष्ट्रीय लढती आणि लीगचा महिलांच्या क्रिकेट सामन्यात संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुरुषांच्या क्रिकेटचा कार्यक्रम सध्या खूपच भरगच्च आहे. एकाचवेळी लीग आणि आंतरराष्ट्रीय लढती होत आहेत. हे भविष्यात महिलांच्या क्रिकेटबाबत घडू नये, खेळाडूंवर जास्त ताण येणार नाही, याकडे लक्ष द्यावे अशी सूचनाही केली आहे. अनेक देशांत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या उत्पन्नात कमालीचा फरक आहे. मात्र काही देशातील महिला क्रिकेटपटूंनी लीगला जास्त महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे, याकडेही एमसीसीने लक्ष वेधले.
समतोल आवश्यक
फ्रँचाइज संघ खेळत असलेल्या लीग तसेच कसोटी क्रिकेट यात समतोल हवा अशी सूचना भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्येच खेळाडूंचा जास्त कस लागत असतो. त्यात सर्वोत्तम कौशल्य असलेले खेळाडूच यशस्वी होतात. क्रिकेटमध्ये कायम कसोटी क्रिकेटला जास्त महत्त्व हवे. विविध देशातील क्रिकेट बोर्ड लीग आणि कसोटी क्रिकेट यात योग्य समतोल राखण्याकडे नक्कीच लक्ष देतील, अशी अपेक्षा गांगुली यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीची, त्यातील यशाची कशाबरोबरही तुलनाच होऊ शकत नाही. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्यावेळी लाभणारी संपूर्ण देशाची साथ खूपच मोलाची असते. आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीनुसारच खेळाडूंचे मोठेपण ठरते, असे ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले. सचिनची शंभर शतके, मुरलीधरनच्या आठशे विकेट सर्वांच्या लक्षात आहेत, असेही त्यांनी सांगितले.