गुरुवारी लग्न सोहळा तेलंगणाच्या घटकेसरमध्ये पार पडणार होता. नववधूकडील मंडळी कोठागुडेम मधील भद्राद्रीमधून लग्नासाठी दाखल झाली होती. लग्नासाठी हॉल सजवण्यात आलेला. वऱ्हाडी मंडळी मुहूर्त जवळ येण्याची वाट बघत होती. मात्र, नववधू लग्नाच्या ठिकाणी आलीच नाही. तिनं आणि तिच्या कुटुंबीयांनी एका हॉटेलमध्ये जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला.
यानंतर वरपक्षाकडील मंडळी हॉटेलवर गेली त्यांनी वधूपक्षाला लग्नाच्या ठिकाणी न येण्याचं कारण विचारलं. त्यावेळी वधूपक्षाकडून आणखी पैशांची मागणी हुंडा म्हणून करण्यात आली. या मागणीमुळं वरपक्षाच्या पायाखालची जमीन सरकली.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच वरपक्षानं लग्नमंडपातून काढता पाय घेतला आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी यानंतर वधूच्या कुटुबीयांना बोलावणं पाठवलं. पोलिसांसमक्ष दोन्ही कुटुबांमध्ये चर्चा झाली. दोन्ही कुटुंबांनी लग्न मोडलं.
पोलिसांनी याविषयी टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिक माहिती दिली. मुलीलाच त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, त्यामुळं तिनं अधिक पैशांची मागणी केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लग्नाच्या निमित्तानं नववधूच्या घरच्यांना २ लाख रुपयांचा हुंडा मिळाला होता. मात्र, नववधूला लग्न करायचं नसल्यानं २ लाख रुपये वरपक्षाला माघारी देण्यात आले. दोन्ही कुटुंब लग्न न लागताच परतली.
दरम्यान, भारतात नवरी मुलगी किंवा तिच्या वडिलांकडून हुंडा घेण्यावर कायद्यानं बंदी आहे. नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. सामाजिक संघटना आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्त्री मुक्तीच्या चळवळींनी आंदोलनं केल्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात आला.
मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, भरपावसात वीज कोसळली अन् नारळाचं झाड पेटू लागलं