कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून शनिवारी पहाटे धाड टाकण्यात आली. त्यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे पाच वाजता छापा टाकला. यानंतर कागलमधील हसन मुश्रीफ यांना दैवतासमान मानणारे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे, असे समजताच घराबाहेर अवघ्या काही क्षणांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत ईडीविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कागल पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाला पाचारण केले. मात्र, हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते कोणालाही जुमानायला तयार नव्हते. यामधून पोलीस आणि मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकारही घडला. यादरम्यान, एका कार्यकर्त्याने स्वत:चं डोकं डोकं जमिनीवर आपटून फोडून घेतले. सागर दवणे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

सागर दवणे हा हसन मुश्रीफ यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याने आपल्या अंगावर हसन मुश्रीफ यांचा टॅटू गोंदवून घेतला आहे. यापूर्वीही ईडीने मुश्रीफांच्या घरी धाड टाकली होती तेव्हाही आंदोलन करणाऱ्यांमध्ये सागर दवणे आघाडीवर होता. आजदेखील मुश्रीफांच्या घरी धाड पडल्याचे समजताच सागर दवणे त्याठिकाणी पोहोचला. यावेळी सागर दवणे यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमिनीवर स्वत:च डोकं आपटून घेतलं. यामुळे त्याच्या डोक्याला मार बसला आणि कपाळातून रक्ताची धार वाहू लागली. हा प्रकार पाहून सर्वचजण अवाक झाले. इतर कार्यकर्त्यांनी सागर दवणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सागर दवणे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या सगळ्या प्रकारामुळे मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत.

आम्हाला अजून किती त्रास देणार, गोळ्या मारून संपवून टाका; मुश्रीफांच्या पत्नीने फोडला टाहो

‘मुश्रीफांच्या घरातील लहान मुलांना आणि बायकांना काही झाले तर याद राखा’

ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्या घरी दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. यावेळी हसन मुश्रीफ घरी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी केल्याचे समजते. यावेळी मुश्रीफांच्या घराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला. साहेब नसताना ईडीचे अधिकारी पहाटे मुश्रीफ यांच्या घरी पोहोचले. या सगळ्यामुळे घरातील लहान मुलांना ताप भरला आहे. हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला रडू कोसळले. घरातील कोणत्याही व्यक्तीला काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here