ED raid at hasan mushrif residence | हसन मुश्रीफ यांच्या घरी पहाटे पाच वाजेपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. किरीट सोमय्यांचा मुश्रीफांवर प्रहार.

 

हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या वारंवार हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार, असे इशारे देत होते
  • आज हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली
मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सक्तवसुली संचलनायल अर्थात ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत भाजप नेते किरीट सोमय्या हे महत्त्वाचा दुवा ठरले आहेत. राज्यातील कोणत्याही नेत्यावर केंद्रीय यंत्रणांकडून विशेषत: ईडीकडून होणाऱ्या कारवाईची कुणकुण किरीट सोमय्या यांना आधीच लागते. त्याआधारे किरीट सोमय्या हे सोशल मीडियावरुन संबंधित नेता तुरुंगात जाणार, असा इशारा देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या काही तासांमध्येच संबंधित नेत्यावर ईडीची धाडही पडते. असाच काहीसा प्रकार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याबाबत घडला.

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार, असे इशारे देण्यात आले होते. त्यामुळे आज हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडताच अनेकाच्या भुवया उंचावल्या. राजकीय नेत्यांवर होणाऱ्या ईडीच्या कारवाईची माहिती तुम्हाला आधीच कशी मिळते, असा प्रश्न किरीट सोमय्या यांना एका मराठी वृत्तवाहिनीकडून विचारण्यात आला. त्यावर किरीट सोमय्या सुरुवातीला खदाखदा हसले. पुढे त्यांनी म्हटले की, ‘मला इतकं हसायला येतंय. या सगळ्या लोकांनी चोरी केली, लबाडी केली, लुटमार करुन पैसे जमवले. हे सिद्ध होत असताना त्याविषयी यांच्यापैकी कोणीही बोलायला तयार नाही. किरीट सोमय्या ईडीने कारवाई करावी यासाठी इतकी धडपड का करतो, त्याला कारवाई होणार, हे अगोदरच कसं कळतं, असे प्रश्न विचारले जातात. हसन मुश्रीफ यांनी चोरी केली, भ्रष्टाचार केला. कोल्हापूर बँकेच्या माध्यमातून अवैधरित्या कर्ज घेतलं. या सगळ्याची उत्तरं देण्याची हिंमत हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
आम्हाला अजून किती त्रास देणार, गोळ्या मारून संपवून टाका; मुश्रीफांच्या पत्नीने फोडला टाहो

तुम्हाला माहिती कुठून मिळते, किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर

ठाकरे सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पण ते माझ्यावरील एका पैशाचाही आरोप सिद्ध करु शकले नाहीत. किरीट सोमय्या काय करतो, त्याला माहिती कुठून मिळते, असा प्रश्न विचारला जातो. होय मी, ईडीकडून कारवाई होण्यासाठी धडपड करतो, जिद्दीने लढतो. त्यामुळेच महाराष्ट्राली लोकांचा किरीट सोमय्यावर विश्वास आहे. ज्या लोकांचे पैसे लुटले जातात, ज्या शेतकऱ्यांना लुटले जातात, ते माझ्याकडे येऊन सगळी माहिती देतात, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
मुश्रीफांच्या घरी ईडीची धाड, संतापलेल्या कार्यकर्त्याने डोकं आपटून घेतलं, रक्तबंबाळ होऊनही घोषणा देत राहिला

सुप्रिया सुळेंची ईडीच्या कारवाईवर टीका

हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही. अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. १०९ वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. ईडी मुश्रीफ यांच्या घरी तिसऱ्यांदा जात आहे. पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here