बीड जिल्ह्यातील दिंद्रुड गावाजवळ असलेल्या पिंपळगावच्या मायकर कुटुंबाने आईच्या निधनानंतर क्रांतिकारी निर्णय घेऊन आदर्श अंत्यविधी केला. मायकर कुटुंबातील कृष्णाबाई रोहिदास मायकर यांचे ७ मार्च रोजी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर अंबाजोगाई येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ८ मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पारंपारिक कुठलाही विधी न पाळता व होणाऱ्या खर्चाचा सदुपयोग म्हणून ११ मुलींच्या नावे प्रत्येकी १० हजारांचं फिक्स डिपॉझिट करुन त्यांना ते बॉण्ड सुपूर्द करणार असल्याचं मायकर कुटुंबाने सांगितलं.
पिंपळगावचे सुभाष मायकर हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेली अनेक वर्ष ते काम करतायेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ते जाणून आहेत. रुढी परंपरांच्या नावाखाली होणारा खर्च आपल्या कुटुंबात व्हायला नको, तेच पैसे आपण गरजूंना द्यावेत, असं सुभाष मायकर यांना वाटत होतं. त्यांनी ही संकल्पना आपल्या घरातील भाऊ-बहिणींना सांगितली. त्यांनीही होकार दिला.
गंगेत राख न टाकता वृक्षारोपणात वापर
हिंदू धर्माच्या प्रथेनुसार राख सावडल्यानंतर ती वाहत्या पाण्यात टाकली जाते. पण मायकर कुटुंबाने या परंपेरला फाटा देऊन ती राख नदीत न टाकता आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करुन शेतातच टाकली. तेराव्यासाठी होणारा खर्च जवळपास १ लाख १० हजार रुपये मुलींच्या भविष्य निर्वाहासाठी वितरित करण्याचे ठरवले.
विटाळ पाळू नका
सध्या जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. नात्यातील कुणा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नोकरी व्यवसायामुळे फार दिवस विटाळ पाळणं जमत नाही, हेच लक्षात घेऊन मायकर कुटुंबाने स्तुत्य निर्णय घेतला. गावात मायकरांची जवळपास १०० घरं. सगळ्यांनीच विटाळ न पाळता मोजक्या ४ कुटुंबातील व्यक्तींनीच ५ दिवसांचा विटाळ पाळावा, अन्य कुटुंबाने पाळू नये तसेच इतरांना देखील कोणतेच बंधन राहणार नाही, असं मायकर कुटुंबाने सांगितलं.
मायकर कुटुंबाने घेतलेले निर्णय क्रांतिकारी आहेत. कुटुंबाने टाकलेले परिवर्तनवादी पाऊल इतरांसाठीही आदर्शवत ठरणार आहेत. मायकर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचं बीड जिल्ह्यात कौतुक होतंय.