आजच्या सत्रात स्थावर मालमत्ता, बँका, एनबीएफसी, आयटी, टेक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे.आजच्या सत्रात टेक महिंद्रा, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, एसबीआय, एशियन पेंट पॉवरग्रीड, एचडीएफसी हे शेअर घसरले. टायटन, टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस आणि भरती एअरटेल हे शेअर तेजीत आहेत.
आशियातील सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणवाने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि सोने या दोन प्रमुख वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने दर १.२ टक्क्यांनी वाढून १५६९ डॉलर प्रति औस गेला आहे. खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल ६९.६२ डॉलर आहे.
दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात आज सायंकाळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. मात्र दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या कारणांमुळे होतेय घसरण
– अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव वाढला आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः परदेशी गुंतवणूकदार अशा अनिश्चित परिस्थितीत भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांमधून पैसे काढू शकतात, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत.
– दरम्यान दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
– हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारात घसरण झाली होती. डाऊ २३३ अंकांनी घसरला होता. ‘एस अँड पी’ इंडेस्क २३ अंकांनी आणि नॅसडॅक ७१ अंकांनी घसरला होता.
– मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये शुक्रवारी १६२ अंकांची घसरण झाली होती. निफ्टी ५६ अंकांनी घसरला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times