जालनाः जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील दत्तू वामन बोराडे (वय ६५) व कमलबाई बोराडे (वय ५९ ) हे वृध्द दाम्पत्य जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता.सिल्लोड) पोलीस ठाण्याच्या समोर खामगावकडे वळण घेत असताना क्रुझरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील बोराडे दाम्पत्य आज सकाळी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मुलीकडे जाऊन चार सुखदुःखाच्या गप्पा होतील. तिच्या मुलाबाळांना खेळवू, तिच्या घरच्यांशी गप्पा मारू लेकीने खूपच आग्रह केला तर एखादा दिवस मुक्काम करू अश्या विचाराने मुलीला भेटण्याच्या ओढीने हे दाम्पत्य गावातून मोठ्या आनंदाने निघाले. पण नियतीच्या मनात मात्र काही भलतेच होते. त्यांच्या मुलीला आई वडिलांच्या मृत्यूची बातमीच मिळाल्याने सगळ्या गावावर दुःखाची छाया पसरली आहे.

घरून दुचाकीवर निघालेले हे कुटुंबीय फुलंब्री सिल्लोड रोडवरील खामगाव फाट्यापर्यंत आले आणि त्याच वेळेस पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १९, एपी २९८८ या क्रुझर जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की क्रुझरच्या धडकेने बोराडे दाम्पत्य दुचाकीवरून दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी ही घटना पाहताच मदतीसाठी धावपळ केली, कुणी तरी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस? पाहा काय आहे हवामान अंदाज
वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि नातेवाईकांनी मुला मुलींनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी वडोदबाजार ठाण्यात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत बोराडे दाम्पत्यावर दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात दगडवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने दगडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

पाण्यावरुन वाद टोकाला; पालघरमध्ये महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here