अद्वय हिरेंना मोठी जबाबदारी आणि ठाकरेंची सभा
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील फुटीनंतर बुलढाणा जिल्ह्यात एक सभा घेतली. दुसरी सभा रत्नागिरीतील खेडमध्ये पार पडली. आता तिसरी सभा दादा भुसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव मध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरे यांनी उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे.
मालेगावात दादा भुसेंना आव्हान
मालेगावातील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांनी भाजपची साथ सोडून शिवसेनेत २७ जानेवारीला प्रवेश केला होता. अद्वय हिरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून दादा भुसे यांच्याकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अद्वय हिरे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे दादा भुसे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघात मोठं आव्हान देणार का हे येणाऱ्या २६ मार्चच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरुन दिसून येईल.
विश्वास सार्थ ठरवणार
उद्धव ठाकरे यांनी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभारी असून पक्षानं जो विश्वास ठेवलाय तो सार्थ ठरवेन, असं अद्वय हिरे यांनी म्हटलं आहे.