अहमदनगर : शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेच्या बहुतांश हालचाली गुवाहाटीतून झाल्याने विरोधकांकडून यावरून टीका होते. तर सत्ताधाऱ्यांकडूनही गुवाहाटीचा आवर्जून उल्लेख केला जातो. असाच एक प्रकार अधिवेशनात पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारला. त्यावर मंत्र्यांनी उत्तर देताना मिश्लिकलपणे गुवाहाटीचा उल्लेख केला. पुढे हीच संधी साधून प्रश्न विचारणाऱ्या माजी मंत्र्याने बच्चू कडू यांना डिवचले.

त्याचं झालं असं की… राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि तत्कालिन ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे त्यावेळी नगरविकास खाते होते. तनपुरे यांच्या मतदारसंघातील नागरदेवळे या भिंगार आणि नगर शहराजवळील भागातील गावे एकत्र करून नगरपालिका स्थापन करण्यात आली होती. काही नागरिकांचा त्याला पाठिंबा होता, कर काहींचा विरोध होता. याच मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगरपालिकेला विरोध होता. कर्डिले यांचे गाव त्याच्या शेजारीच आहे. पुढे सरकार बदलले. त्यामुळे नव्या सरकारने हा निर्णय फिरविला आणि नागरदेवळेची पुन्हा ग्रामपंचायत केली.यासंबंधी तनपुरे यांनी अविशेनात प्रश्न मांडला.

मतं फोडली, अध्यक्षपद खेचून आणलं, ‘किंगमेकर’ कर्डिलेंना फडणवीसांकडून शाबासकीची थाप
एकदा झालेला निर्णय सरकारने कशाच्या आधारे फिरवला, असा सवाल त्यांनी केला. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी तांत्रिक गोष्टी सांगून थेट उत्तर देणे टाळले. मात्र, तुम्ही जर त्यावेळी गुवाहाटीला आला असता तर आम्ही तुम्हाला पुन्हा राज्यमंत्री करण्याची शिफारस केली असती, असे सामंत म्हणाले.

एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंनी डिवचलं
याचा व्हिडिओ आता तनपुरे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी म्हटले आहे. मंत्री महोदयांनी तांत्रिक बाब पुढे करून मूळ प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यांनी गंमतीने जरी गुवाहाटीचा उल्लेख केला असला, तरी माझ्या मतदारांनी मला पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा जनादेश दिला होता. त्यामुळे त्यांनी माझी कॅबिनेट मंत्री म्हणून जरी शिफारस केली असती, तरी माझे मतदार व आदरणीय पवार साहेबांच्या विचारांशी प्रतारणा कदापि केली नसती. मात्र आमचे तत्कालीन राज्यमंत्री सहकारी बच्चू कडू साहेबांची शिफारस कुठेतरी निश्चितच कमी पडते आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या बच्चू कडू यांना डिवचण्याची संधी या निमित्ताने तनपुरे यांनी साधली असल्याचे दिसून येते. तसेच भाजप-शिंदे गट बच्चू कडू यांना अजूनही मंत्रीपद देऊ शकलं नाही, म्हणत कडूंच्या दुखावरची खपलीही त्यांनी काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here