धक्कादायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलं आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावावर बलात्काराच्या कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीला संगमनेर जवळील लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन कुटुंबातील एका भावाच्या २० वर्षीय मुलाने नात्याने सख्खी चुलत बहिण असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सात-साडेसात महिन्यांत वारंवार अत्याचार केले.
त्यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याने लोणी येथील एका रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात अत्याचाराचे कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.