मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची आपण घोषणा केली तेव्हा विरोधकांनी आपली खिल्ली उडवली होती. समृद्धी महामार्गाचा हा प्रकल्प १ लाख कोटीत पूर्ण करणंही शक्य होणार नाही, असं विरोधक म्हणाले होते. पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि आम्ही हे काम करून दाखवलं आणि विरोधकांना खोटं पाडलं. इतका मोठा आणि भव्य प्रकल्प राज्यात राबवला गेला. आणि फक्त सहा महिन्यात नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण करून वाहतूक सुरू झाली, असं फडणवीस म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कर्जत व जामखेड येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकी ३८ अशा एकुण ७६ नवीन निवासस्थानांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री यांनी पोलीस निवासस्थानांची पाहणी केली.
आपण विधिमंडळात काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची विरोधकांनी पुन्हा खिल्ली उडवली आहे. राज्य सरकारने घोषणा केलेल्या कल्याणकारी योजनांसाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी एवढा निधी कुठून येणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. पण महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याला निधीची कमतरता नाही. योजना राबवण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी आहे. त्याही पेक्षा आमच्या सरकारकडे घोषित केलेल्या योजना राबवण्याची इच्छाशक्ती आहे. फक्त आपल्या तुंबड्या भरणाऱ्यांनाच निधीची चणचण भासते, असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. राज्याच्या आर्थिक विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच अस्मानी संकटामुळे शेतकरी जेव्हा अडचणीत येईल, त्यावेळी सरकार त्यांच्या मदतीला धावेल. आणि आम्ही शेतकऱ्यांना मदत करतच राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.