म. टा. वृत्तसेवा, येवला : राज्यभरात सध्या दहावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. करिअरमधील महत्त्वाचा टप्पा असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांसह पालकही गांभीर्याने घेतात. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. मात्र अपेक्षित गुण मिळवण्याच्या ओझ्यामुळे अनेकदा विद्यार्थी दबावाखाली येतात आणि नको ते पाऊल उचलतात. अशीच काहीशी घटना येवला तालुक्यात घडली असून तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तणावातून आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला आहे.

येवाल्यातील चिचोंडी बुद्रुक येथील सौरव नवनाथ गायकवाड (वय-१८) या नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तसंच तालुक्यातील डोंगरगाव येथील गणेश नामदेव सोमासे (वय-१६) या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केली.

प्रश्न नगरचा, मंत्र्यांच्या उत्तरात गुवाहाटीचा उल्लेख, राष्ट्रवादीच्या नेत्याने बच्चू कडू यांच्या जखमेवरची खपली काढली!

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सोमासे हा दहावी परीक्षेतील नुकताच झालेला इंग्लिशचा पेपर अवघड गेल्याने तणावात होता. या तणावातून त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

आत्महत्या केलेल्या सौरव गायकवाड आणि गणेश सोमासे या दोघांचे मृतदेह रविवारी सकाळी येवला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत पेंडकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांवर शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा हे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे असले तरी येथे आलेल्या अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत, असं आवाहन आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here