नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाच्या बेलापूर, चितळी, पुणतांबा या दुहेरी मार्गावरील कामासाठी २२ आणि २३ मार्च रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरवरून सुटणाऱ्या सहा एक्स्प्रेस गाड्या २० ते २३ मार्च दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर २०, २१ आणि २३ मार्च दरम्यान प्रवास करण्याचे नियोजन असेल तर सदर प्रवाशांना प्रवासासाठी इतर पर्यायी साधनांचा विचार करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी अमोल गहुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजन अंतर्गत येत असलेल्या दौंड ते मनमाड रेल्वे मार्गाचा विस्तार म्हणजेच दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याने बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकादरम्यान लाईन डबलिंग प्रोजेक्टसाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे. त्याकरीता या मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने नागपूरमार्गे धावणाऱ्या, नागपुरातून सुटणाऱ्या तसेच नागपूर येथे येऊन थांबणाऱ्या एकूण सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हावडा-पुणे आणि पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन

नेमका काय बदल होणार?

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूरहून निघणार असल्याचे नियोजित वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे, तर २२ आणि २३ तारखेला गोंदियाहून धावणारी ट्रेन क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच ट्रेन क्र. १२११४ नागपूर-पुणे एक्स्प्रेस नागपूर येथून २१ तारखेला, ट्रेन क्र. १२११३ पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे येथून २२ मार्च, गाडी क्रमांक १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस २२ मार्च, गाडी क्रमांक १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस पुणे येथून २३ मार्च रोजी पुण्याहून सुटणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

पुणे-हावडा गाडीच्या मार्गात बदल

ब्लॉकमुळे १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद रेल्वे गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी दौंड, वाडी, सिकंदराबाद, बल्लारशा मार्गे नागपूरला येईल आणि हावडाच्या दिशेने रवाना होईल, त्याचप्रमाणे १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी नागपूर ते बल्लारशा, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here