म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बेस्टकडून महिला प्रवाशांना खास भेट देण्यात येणार असून या वर्षाखेरपर्यंत ताफ्यात टप्प्याटप्प्याने एकूण तीन हजार वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. यापैकी ५०० बस महिला प्रवाशांसाठी चालवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात महिला प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर होणार आहे.
बेस्ट बसमधून दररोज ३७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या अंदाजे ३० ते ३३ टक्के आहे. प्रवास करताना सकाळी व सायंकाळी बरीच गर्दी असते. त्यात धक्काबुकी, बसण्यासाठी आसन न मिळणे आदींमुळे प्रवास त्रासदायक होतो. महिला प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी बेस्टने काही वर्षांपूर्वी विशेष बसफेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ पासून फक्त महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवेत आणल्या. सकाळी ८ ते सकाळी ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत तेजस्विनी बसची महिलांसाठी सेवा असते. सध्या अशा १३६ तेजस्विनी बस ताफ्यात आहेत. याव्यतिरिक्त महिलांसाठी गर्दीच्यावेळी २९४ विशेष बस फेऱ्याही चालवण्यात येतात. या फेऱ्या विविध मार्गावर सकाळी ८.३० ते सकाळी १० आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेसात वाजेपर्यंत असतात. पूर्वी ५७ बसच्या ७० विशेष फेऱ्या होत्या. त्यात हळूहळू वाढ करण्यात आली. समलिंगी विवाहास विरोध; ही प्रथा भारतीय कुटुंबपद्धतीला धरुन नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे बेस्टच्या ताफ्यात सध्या साध्या बसबरोबरच एसी बसही आहेत. येत्या काळात बसचा एकूण ताफा दहा हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट असून यापैकी बहुतांश बस एसीच असणार आहेत. या वर्षाखेर तीन हजार एसी बस दाखल करण्याचे उद्दिष्ट बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे. यापैकी ५०० एसी बस फक्त महिलांसाठी चालवण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र यांनी दिली. या मोठ्या आकाराच्या एकमजली बस असतील. त्या महिलांसाठी विशेष बस म्हणूनच चालवण्यात येतील. यामुळे त्यांच्या फेऱ्याही वाढतील. मोठ्या प्रमाणात बस आल्यास महिला प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार असल्याचे ते म्हणाले.