अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.यावरही बोलताना अब्दुल सत्तार यांनी थोडीही संवेदनशीलता न दाखवता आपल्या मतदारसंघात सर्वकाही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही. मोठं नुकसान नाही, परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहोत, असे सरकारी छापाचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता असून हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्र्याच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपवून घेतल्याची माहिती समोर आली होती. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय ५५ वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत. दोन्ही शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. याच नैराश्यातून दोघांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पंचनामे झाल्यावर आम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपण शेतकऱ्यांना मदत देणारच आहोत, तुम्ही घाई करू नका. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. पंचनामे झाले की तात्काळ मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिले होते.