अहमदनगर: गेल्या विधानसभा निवडणुकीत विधान सभा निवडणुकी झालेला पराभव, २०१९ मध्ये पक्षाने उमेदवारीच नाकारणे आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. रविवारी त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी (१४ मार्च) शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? त्यानंतर भाजप की अन्य पर्याय निवडणार? नव्याने नाते संबंध जोडलेले गडाख आणि राजळे यांच्याशी सुसंगत त्यांचा निर्णय असू शकतो काय? याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी लागल्याने घुलेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातील काहींना आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ज्या संचालकांची मते फुटली त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. एवढेच नाही तर याला जबाबदार धरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणीही घुले समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे. या आक्रमक कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी घुले यांनी रविवारी शेवगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये मंगळवारी मेळावा घेण्याचे ठरले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, भाऊराव भोंगळे, मन्सुर फारोकी, अशोक दातीर, नंदकुमार मुंढे, शरद सोनवणे, अशोक जमधडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत चंद्रशेखर घुले म्हणाले, मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत व पुढील निवडणुकीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात मी भुमिका स्पष्ट करणार आहे. त्यानुसार शेवगावमध्ये मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मेळावा होणार आहे. माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि त्यांचे वडील स्व. मारूतराव घुले या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. सुरवातीपासूनच घुले बंधू राष्ट्रवादीत होते. सुरवातीला नरेंद्र घुले आमदार होते. त्यानंतर २००९ मध्ये चंद्रशेखर घुले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. पुढे २०१४ मध्ये भाजपच्या मोनिका राजळे यांनी घुले यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये पक्षाने घुले यांना उमेदवारी दिली नाही. त्यावेळी अॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा राजळे विजयी झाल्या होत्या
मतं फोडली, अध्यक्षपद खेचून आणलं, ‘किंगमेकर’ कर्डिलेंना फडणवीसांकडून शाबासकीची थाप

पुढच्या विधानसभा निवडणुकीतही घुलेंना संधी मिळण्याची शक्यता कमी

आगामी निवडणुकीतही शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून ढाकणे हेच राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदारे आहेत. त्यासाठी त्यांनी पूर्वीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पक्षाचे वरिष्ठ नेतेही वेळोवेळी हजर राहिले आहेत. मधल्या काळात घुले यांच्या कुटुंबात राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांना पक्षाची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. अलीकडेच त्यांना जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. मात्र तेथे पराभव झाल्याने ते पुन्हा बॅकफूटवर गेले आहेत. एक तर विधान सभेची उमेदवारी त्यांच्यासाठी दूर आहे. आता बँकेतील पराभवामुळे विधान परिषदेपुढेही प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर घुले यांनी वेगळी भूमिका घेण्याचे ठरविल्याचे दिसून येते. मधल्या काळात त्यांची ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कुटुंबियांशी सोयरिक झाली. त्यातूनच त्यांचे मतदारसंघातील विरोधक राजळे यांच्याशीही नाते जोडले गेले. नगर जिल्ह्यात सोयऱ्या घायऱ्यांचे राजकारण आहे, हे उघड आहे. मात्र, त्याचा जसा फायदा आहे, तसाच तोटाही आहे. गडाखांशी घुले यांची झालेली सोयरिक इतर काही सोयरे आणि राजकारण्यांना खटकल्याचेही सांगण्यात येते.

त्यामुळे आता घुले पुढे काय करणार? याकडे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी असाच पेच गडाख यांच्यापुढे निर्माण झाला होता. त्यावेळी शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विधानसभेचे निवडणूक लढविली. पुढे क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केला. विधानसभेला भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळविले. मधल्या घडामोडीनंतरही ते ठाकरे यांच्यासोबत ठाम राहिले आहेत. असाच काही पर्याय घुले घेणार का? की ते भाजपमध्ये जाऊन राजळे यांच्याऐवजी उमेदवारी मिळविण्यात यशस्वी होणार? की केवळ स्वत:त्या पक्षावर दबाव आणून आपल्याकडे लक्ष वेधून घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here