किरण आणि भाग्यश्रीच्या लग्नाची नुकतीच होती वर्षपूर्ती, ४ वर्षीय चिमुकला झाला पोरका
मृत किरणचा शहरातील राजीव गांधी मार्केटमध्ये लॉंड्रीचा व्यवसाय होता. शनिवारीच किरणने सात लाख रुपये किमतीची नवीन मशीन घेऊन त्याचे उद्घाटन केले होते. वर्षभरापूर्वी त्याचे भाग्यश्रीसोबत लग्न झाले होते. भाग्यश्री आणि किरण या दोघांच्या लग्नाची काही दिवसांपूर्वीच वर्षपूर्ती झाली होती. मात्र दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर अपघातात श्रद्धा बर्वे यांच्यासह त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पती सुरेश व चार वर्षांचा मुलगा जतीन गंभीर जखमी आहेत. आईच्या मृत्यूमुळे चार वर्षांचा जतीन आईच्या मायेला पोरका झाला आहे.
फक्त पायांचे दर्शन घेऊन दिला मुखाग्नी, चेहराही पाहता आला नाही
प्रमिला बोरुडे व हौसाबाई बर्वे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या .दोन्ही बहिणींचे कुटुंब हे शहरातच राहायला होते. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो वा सन-उत्सव दोन्ही कुटुंब एकत्रितपणेच साजरा करायचे. शेगावला दोन्ही परिवार सोबत जाताना त्यातील सहा जण मृत्युमुखी पडले होते, तर सहा जखमींवर औरंगाबादेत उपचार सुरू होते. रात्री शहरात चार रुग्णवाहिकेतून सहा मृतदेह आले. संपूर्ण झाकलेल्या अवस्थेतील मृतांचे चेहरेही नातेवाईकांना पाहता आले नाहीत. फक्त पायांचे दर्शन घेऊन सर्व सहा मृतांवर एकाच स्मशनाभूमीत नातलगांनी अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.