या प्रकरणाच्या तपासात आता वेगळीच माहिती समोर आली आहे. वॉचमननं दिलेली माहिती अपुरी असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी सांगितलं. ‘इमारतीच्या परिसरात आणि आतमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आली आहेत. शाह दाम्पत्य संध्याकाळी ४ वाजताच दुचाकीवरून इमारतीत आल्याचं त्यात दिसून आलं आहे. त्यानंतरही ते आत येताना दिसले,’ असं सावंत म्हणाले.
साक्षीदारांनी दिलेल्या जबानीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज, कॉल डेटा रेकॉर्ड्स आणि टॉवर लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना सीडीआर आणि टॉवर लोकेशन सापडलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
शाह दाम्पत्याच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू असल्याचं परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितलं. याबद्दलचे सर्व तर्कवितर्क त्यांनी फेटाळून लावले. ‘शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालातून मृ्त्यूचं नेमकं कारण कळू शकेल,’ असं कराड म्हणाले. दाम्पत्याचा व्हिसेरा, टिश्यूज कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.