मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या रॅलीतील एका आक्षेपार्ह व्हिडीओवरुन सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. तो व्हिडीओ मॉर्फ केलेला असून माझ्या बदनामीच्या दृष्टीने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला, असा थेट आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. तर संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असं सांगतानाच तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका, अशी रोखठोक प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. या सगळ्या व्हिडीओच्या वादाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. भाजप-शिवसेनेच्या महिला आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याविषयावर रोखठोक भाष्य केलंय.

अजित पवार काय म्हणाले?

राजकीय क्षेत्रात असो किंबहुना कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःचं चारित्र्य जपणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सर्वसामान्य लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. एकवेळ राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायची गरज नाही. मात्र, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले आहेत का? त्यामागे कुणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी झाली पाहिजे.

म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे, एखाद्या महिलेची बदनामी नको. त्या व्हिडीओची स्पष्टपणे चौकशी करुन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीये.

माझ्या पप्पांची बदनामी होतीये, राज सुर्वेंची पोलिस ठाण्यात धाव, त्या VIDEO वरुन विधानसभेतही राडा
त्या व्हिडीओवरुन विधानसभेतही राडा

शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. प्रतिष्ठीत महिलेबाबत व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा सांगायचं, तिने स्वतःला किती वेळा सिद्ध करायचं. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे व्हावी, अशी मागणी भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी केली.

तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबर महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून तो व्हिडीओ व्हायरल केला गेला. ही वेळ आज त्यांच्यावर आहे, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते, त्यामुळे त्वरित चौकशी करून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आमदार यामिनी जाधव यांनी केली.

तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका, शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांचा इशारा
शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमास आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणे टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मातोश्री या फेसबुक पेजवर व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.

बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघाले आहेत. तेव्हा त्यांच्याबरोबर असणे आवश्यक वाटले. त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. तिथून आम्हा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने बोलणे सुरू झाले आहे. गेले आठ महिने आम्ही वाईट पद्धतीने ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरीदेखील आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. आपल्या कामाकडे लक्ष दिले, असंही म्हात्रे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here