टॉमेटो खरेदी करताना सामान्य ग्राहक बाजारपेठेत घासाघीस घरत आहेत. त्यामुळे एक किलो टॉमेटोला अवघा एक रुपया इतका दर मिळत आहेत. सोयाबीन तूर कापूस पाठोपाठ फुलकोबी आणि आता टोमॅटो देखील त्याचा रंग दाखवत आहे. टोमॅटोला अवघ्या एक रुपया भाव मिळत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच टोमॅटो फेकून निषेध केला .भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने धामणगाव धाड परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
धामणगाव धाड परिसरातील यावर्षी सुरुवातीपासून चांगल्यापैकी पाऊस होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी मध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, गहू, मोहरी आधी पिकांची लागवड केली आहे. तसेच विहीर तलावांना पाणी मुबलक असल्याने भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे . भाजीपाल्याचे उत्पन्नही चांगले झाले आहे .मात्र टोमॅटोसह इतर पिकांना भावात मिळत नसल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने विक्रीसाठी घेऊन आले होते परंतु कॅरेटला दहा रुपये क्रेटप्रमाणे मागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकून देणे पसंत केले. मात्र, शेतकऱ्यांकडून एक रुपया किलोने खरेदी करण्यात आलेले टोमॅटो ग्राहकांना वीस रुपये किलो दराने विकले जात आहेत. यावर्षी अर्धा एकरावर टॉमेटोची लागवड केली होती चांगली उत्पन्न मिळेल आणि भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारामध्ये टॉमेटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आता टॉमेटो तोडणी करायला देखील परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकले आहेत.
हवामान खात्याचा अलर्ट
हे संकट काही कमी आहे का, असं म्हणत असताना पुढील तीन दिवस म्हणजे १४, १५ आणि १६ मार्च रोजी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांचा गडगडात सह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे तोडलेला मालाला सुरक्षित ठिकाणी नेऊन आणि न तोडलेल्या मालाला तोडून त्याला सुरक्षित करणे असे दुहेरी संकट पुन्हा शेतकऱ्यांवर आहे. आपल्या शेतातील गुराढोरांना देखील सुरक्षित ठिकाणी नेण्याची मोठी तारेवरची कसरत त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा मार दुसरीकडे तोंडात आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे.
पिकांना भाव नाही, त्यात अवकाळी पाऊस; पिकं आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून