चालक पतीला रजा न देण्याच्या प्रकारानं चिडलेली पत्नी आगार प्रमुखांच्या कार्यालयाबाहेर बिछाना टाकून झोपली. या घटनेची माहिती आटपाडीतील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर आगारप्रमुख होनराव, जिल्हा सुरक्षा अधिकारी चव्हाण यांनी आटपाडीत धाव घेतली. आटपाडी पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. यानंतर नलिनी कदम यांनी आंदोलन स्थगित केलं.
पतीला रजा मिळत नसल्यानं न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या पत्नीवरच एसटी आगाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला . आटपाडी एसटी आगारातील कार्यशाळा अधीक्षक स्वप्निल हसबे यांनी आटपाडी पोलिसात चालक विलास कदम यांच्या पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. कदम यांच्या पत्नीनं हसबे यांच्यासह विपुल शिंदे, संजय माने यांना शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
याबाबत चालक विलास कदम म्हणाले, मला सुट्टी मिळत नसल्याच्या रागातून पत्नीनं आंदोलन केलं. ज्या एसटी खात्यात मी गेल्या ३० वर्षांपासून सेवा बजावतोय, प्रवासी हेच माझं दैवत म्हणून माझं काम सुरू आहे. सुट्टी नाकारल्यानंतरही मी ड्युटीवर गेलो. पण माझ्या पत्नीनं मला सुट्टी मिळत नसल्यानं एसटी आगाराच्या विरोधात आंदोलन केलं. पण एसटी प्रशासनाकडून माझ्या पत्नीवर चुकीचे आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार अयोग्य आहे.