सर्वच क्षेत्रातील शेअर्सवर दबाव
आजच्या व्यवहारात इन्फ्रा, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून आला. मेटल, फार्मा, एनर्जी, बँकिंग, ऑटो, रियल्टी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. स्मॉल-कॅप शेअर्सवरही आज विक्रीचा दबाव दिसून आला आणि मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स घसरले. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक आज १.८२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.०८ टक्क्यांनी घसरला.
आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स ८९७.२८ अंकांनी किंवा १.५२ टक्क्यांनी घसरून ५८,२३७.८५ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी २५८.६० अंकांच्या म्हणजेच १.४९ टक्के घसरणीसह १७,१५४.३० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स हे निफ्टी घसरले. तर टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स, ओएनजीसी आणि एचयूएल हे शेअर्स वधारलेले होते.
गुंतवणुकदारांचे नुकसान
गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे ६.६ लाख कोटींचे नुकसान झाले असून या दरम्यान, सेन्सेक्स २००० हून अधिक अंकांनी घसरला आहे. केवळ सोमवारीच गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २५८.९५ लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या शुक्रवारी ते २६२ लाख कोटी रुपये होते.
सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याच्या वृत्ताचा संपूर्ण जगाच्या इक्विटी मार्केटवर नकारात्मक परिणाम झाला. विशेषतः बँकिंग क्षेत्रात शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात बँकिंग क्षेत्रातील समभाग कमजोरीसह व्यवहार करताना दिसले. मात्र, भारतीय बँकांच्या बाबतीत नियामक चौकट खूपच मजबूत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे
- जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत
- अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक यांची दिवाळखोरी
- SVB कोसळण्याच्या परिणामामुळे भारतीय बँकिंग शेअर्सवर दबाव वाढला
- रिलायन्स, टीसीएस आणि आयटीसीसारख्या दिग्गजांच्या शेअर्समध्ये कमजोरी
- डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी