झाशीतील अलिगोल खिडकी परिसरात वास्तव्यास असलेल्या दीपक शाक्य यांची बहिण आरतीचा विवाह झाशीमधल्याच प्रेमनगरमध्ये राहणाऱ्या राजकुमारशी झाला. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. लग्न ११ मार्चला संपन्न झालं. शनिवारी नवरदेव वरात घेऊन आला. धुमधडाक्यात लग्न सोहळा संपन्न झाला. त्यानंतर आरतीची पाठवणी करण्यात आली. कुटुंबीयांचा निरोप घेऊन ती कारमध्ये बसली.
राजकुमार कारमध्ये बसायला जात असताना अचानक जमिनीवर कोसळला. त्याचं संपूर्ण शरीर आखडले. तो स्वत:चे कपडे फाडू लागला. तेवढ्यात त्याच्या कुटुंबीयांनी त्याला चप्पल हुंगावली. त्यानंतर त्याची प्रकृती पूर्ववत झाली. यानंतर आरतीनं सासरी जाण्यास नकार दिला.
मुलाकडच्यांनी आणि वरातीत आलेल्या नातेवाईकांनी नवरीला घेऊन जाण्यासाठी हट्ट धरला. ते मागे हटायला तयार नव्हते. तर मुलीकडचे नातेवाईकही तिच्या पाठवणीसाठी राजी होत नव्हते. मुलाकडचे आरतीला कारमधून उतरूच देत नव्हते. तेव्हा मुलीकडचे सगळे कारसमोर उभे राहिले. अखेर आरतीला कारमधून बाहेर काढण्यात आलं. यानंतर मुलीकडचे पोलीस ठाण्यात गेले. मुलाला फेफरं भरतं याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्हाला आरतीचं लग्न राजकुमारशी करून द्यायचं नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.