सचिन शेळके, जितेंद्र तावरे आणि भागवत प्रल्हाद शेळके हे तिघांमधील सचिन शेळके आणि भागवत शेळके हे दोन्ही नातेवाईक आहेत. तर जितेंद्र तावरे हा त्यांच्या शेजारी राहतो. आज सोमवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावात शेळके यांच्या नातेवाईकाचे लग्न होते. या लग्नासाठी सचिन शेळके आणि भागवत शेळके हे दोघं त्याच्या शेजारी राहत असलेल्या जितेंद्र चावरे याच्या एम.एच. १९ सी.एस. ११९८ या क्रमाकांच्या दुचाकीवरुन ट्रीपल सीट बसून पिंपळगाव खुर्द येथे गेले होते. त्यानंतर तिघांनी लग्नात त्यांचे नातेवाईक विजय जगन्नाथ शेळके यांना वरणगाव येथे नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले.
देवाच्या दर्शनाला निघाले पण…काही अंतरावरच मृत्यूने गाठले…
एकाच दुचाकीवरुन तिघेही ट्रीपल सीट पिंपळगाव येथून वरणगाव येथील नागेश्वर मंदिरावर दर्शन जाण्यासाठी निघाले. भागवत शेळके हे दुचाकी चालवत होते. तर सचिन आणि जितेंद्र हे दोघंही मागे बसले होते. तिथून निघाल्यावर काही अंतरावर सुसरी ते पिंपळगावच्या दरम्यान हरी किटकुल बडे माध्यमिक विद्यालयासमोर रस्त्यावर तिघांच्या दुचाकीला भुसावळ आगाराच्या एम.एच. २० बीएल ०९४८ या क्रमाकांच्या बसने जोरदार धडक दिली. अपघाताचा मोठ्याने आवाज आल्याने घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यावर दुचाकीवरील तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. तिघांना तातडीने खासगी वाहनातून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि तिघांनी प्राण सोडले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मयत घोषित केले. अपघातात दुचाकी संपूर्ण चक्काचूर झाली आहे. तर बसच्या समोरुन काही भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी मयत सचिन शेळके यांचे नातेवाईक विजय जगन्नाथ शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बस चालक दिलीप आप्पा तायडे यांच्याविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच गावातील तिघांच्या मृत्यूने संपूर्ण मनुर गाव हळहळलं आहे.