हरभऱ्याचे दरही वाढेनात
एकीकडे सोयाबीनच्या दरात वर्षभरापासून मंदी असतांनाच हरभऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, हरबऱ्यानेही शेतकऱ्यांची निराशा केली आहे. वाशिमच्या बाजारात हरभऱ्याला शनिवारी किमान ३८५० ते ४५५० इतका कमाल दर मिळाला होता. वास्तविक केंद सरकारने ५३३५ रुपये इतका हमीभाव जाहीर केला आहे. उत्पादनासाठी लागणारा सर्व खर्च पाहता किमान इतका तरी दर मिळायला हवा. मात्र हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
नाफेड मार्फत हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र खरेदी नव्हे तर फक्त नोंदणी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदीसाठी आणखी काही दिवस थांबावे लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यासाठी किमान महिन्याभराचा अवधी लागणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मार्च महिना संपण्या अगोदर पीक कर्जाचे पैसे भरायचे असल्याने घाट सहन करून शेतकरी सोयाबीन – हरभऱ्याची विक्री करत आहेत.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीसा
मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असल्याने कर्ज वसुलीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसी पाठवल्या आहेत. चालू महिण्यात पैसे भरल्यास शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळते नंतर मात्र १२टक्क्याने व्याज भरावे लागते त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात शेतमाल विकत आहेत. तर काही शेतकरी पुढे दरवाढ होईल या अपेक्षेने खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन पीक कर्जाची परतफेड करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.