नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड मध्ये खिंडार पडली आहे. राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी धोंडगे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपला राजीनामा पाठवला आहे. शंकरअण्णा धोंडगे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जायचे. शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख देखील आहे.
शंकरअण्णा धोंडगे बीआरएसच्या वाटेवर
राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट देखील घेतली होती. भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप होणार अशी चर्चा होती.
त्यातच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या कार्याची स्तुती देखील केली होती. अखेर शंकरअण्णा धोंडगे यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा बीआरएस पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे.