नवी दिल्ली: शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटानेच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करत शीतल म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटातून संजय राऊत प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणात काही प्रश्न उपस्थित केले. शीतल म्हात्रे ज्या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत आहेत, तो व्हिडिओ खरा आहे की खोटा, त्यामध्ये मॉर्फिंग झाले आहे का, हे तपासण्याची गरज संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांना शीतल म्हात्रे प्रकरणात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी या वादात प्रकाश सुर्वे यांनाही खेचले. व्हायरल व्हिडिओतील जे आमदार आहेत त्यांनी पोलिसांत काही तक्रार केली आहे का, हे पाहिले पाहिजे. त्या पुरुष आमदाराचीही बदनामी झाली आहे. पुरुषाची बदनामी होत नाही का? मिंधे गटाच्या ज्या कोणी महिला नेत्या आहेत त्या म्हणतायत की व्हिडिओमुळे माझी बदनामी होत आहे. त्यावरुन खटले दाखल होऊ शकतात. पण हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला आहे, लाखो लोकांनी पाहिला आहे, मग या सर्वांना तुम्ही अटक करणार का, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानळावरुन उचललं
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. यासंदर्भात राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात एसआयटी चौकशी करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मात्र, सरकारला याप्रकरणात एसआयटी चौकशीची गरज वाटत असेल तर ती जरुर करावी. महाराष्ट्रात महिलांचा सन्मान व्हावा, त्यांचे शोषण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. पण काही गोष्टी राजकारणासाठी आणि सूडाच्या कारवाईसाठी वापरल्या जात असतील तर त्याला राजकीय कृतीनेच उत्तर दिले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर आता शीतल म्हात्रे आणि शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार हे पाहावे लागेल.

शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवर अजितदादा म्हणाले, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या…

ठाकरे गटाचीही पोलिसांत धाव

शीतल म्हात्रे आणि राज सुर्वे यांनी पोलिसांत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन राज सुर्वे यांच्या फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द केला. जी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती राज सुर्वे यांच्या फेसबुक लाईव्हमधीलच आहे, असा दावा विनोद घोसाळकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here