परळी तालुक्यातील नंदागौल गावात एका अल्पवयीन मुलीचा दहावीचा पेपर बुडवून तिचा विवाह लावण्यात आल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली होती. या विवाहाची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना कळताच त्यांच्या आदेशावरून नवरदेव, नवरदेवाचे आई-वडील, नवरीचे आई-वडील दोघांचे मामा यांच्यासह फोटोग्राफर, लग्न लावणारे पंडित, स्वयंपाक करणारे आचारी यासह बँडवाले आणि प्रमुख १३ जणांसह १५० ते २०० वराडींवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ९,१०, ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम १९२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता एखाद्या विवाहाला जायचे असेल तर फोटोग्राफर, भटजी, बँड आणि आचारी यांना मुलीचे वय आणि विवाह अल्पवयीन आहे की नाही याची माहिती करणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा मुला-मुलीच्या आई-वडीलासह लग्नात सहभागी झालेल्या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. या निर्णयानुसार आता बालविवाहमध्ये जायचे की नाही याचा विचार करावा लागणार आहे. अशा पद्धतीने कुठे ही बालविवाह होत असेल तर शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.