Onion Price : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. कांद्याला हजारो रुपयांचा खर्च करुन हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकऱ्याने कांद्याला दर नसल्याने, आपलं एक एकरमधील कांद्याचं पीक मेंढरांसमोर टाकलं आहे.

क्विंटलमागे शेतकऱ्यांना फक्त 600 ते 700 रुपयांचा दर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. एकरी हजारो रुपयांचा खर्च करुनही क्विंटलमागे शेतकऱ्यांना फक्त 600 ते 700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दर उतरल्याने कांद्याची विक्री करण्याऐवजी तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक एकरमधील 60 क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढरांसमोर टाकला आहे. सध्या मिळत असलेल्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी मेंढरांसमोर कांदा टाकला आहे.

कांदा उत्पादकांना 300 रुपये सानुग्रह अनुदान

कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (13 मार्च) विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष देण्याचा निर्णय आहे. तुम्ही गाजर दाखवता आम्ही तर हलवा देतो, असा टोला शिंदेनी विरोधकांना लगावला. 

राष्ट्रीय कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 43 टक्के वाटा

सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळे वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळे एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra News: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here