एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ मीच १० लोकांना पाठवला आहे. युट्यूबवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ३२ देशांतील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. हा व्हिडिओ ओरिजिनल आहे की मॉर्फ आहे, याची चौकशी पोलीस करतच नाहीत. ते फक्त कारवाई करत सुटले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, ‘ मी बिलकूल एकतर्फी कारवाई करणार नाही’. पण एका आमदाराच्या बंदुकीतून गोळी झाडली जाते. त्यानंतर पोलीस म्हणतात की, ‘गोळी झाडली तेव्हा बंदूक आमदाराच्या हातात नसावी. मग आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याच्या हातात देणे हा गुन्हा ठरत नाही का?’ असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला. आमदाराचा व्हिडिओ डुप्लीकेट असेल तर जरुर कारवाई करा. पण तो ओरिजिनल असेल तर खासगी संबंध ज्याच्या त्याच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर त्याच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पण गृहमंत्रालय आणि सरकार गुन्हे करणाऱ्यांच्या बाजूने आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती राज्यात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले.
व्हायरल व्हिडिओनंतर प्रकाश सुर्वे गप्प का; राऊतांचा सवाल
वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत शीतल म्हात्रे यांनी हिरीरीने आपली बाजू मांडली आहे. पण प्रकाश सुर्वे हे एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. हाच मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला. व्हायरल व्हिडिओतील जे आमदार आहेत त्यांनी पोलिसांत काही तक्रार केली आहे का, हे पाहिले पाहिजे. त्या पुरुष आमदाराचीही बदनामी झाली आहे. पुरुषाची बदनामी होत नाही का? तो आमदार कुठे आहे, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.