दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन किती ? या प्रश्नाचे उत्तर एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला २ लाख ७१ हजार ९४७ रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाकडून त्यांना माहिती देण्यात आली आहे. या माहितीत विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रुपये, महागाई भत्ता ३४ टक्के असून तो ६९ हजार ९४८ रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता १० हजार रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता १० हजार रुपये अशी एकूण २ लाख ७२ हजार १४८ रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन २ लाख ७२ हजार ९४७ रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आमदारांना दूरध्वनीसाठी आठ हजार रुपये मिळतात.