सुरुवातीपासूनच करोना नियंत्रणात ठेवण्यात यश आलेल्या नगरची स्थिती जुलै महिन्यात कमालीची खालावली आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग हा १०.१ वर गेल्यामुळे देशातील टॉप अकरा जिल्ह्यात नगरचा समावेश झाला होता. देशाच्या आरोग्य यंत्रणेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली होती. या अहवालात रुग्ण वाढत असलेल्या देशातील टॉप अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये राज्यातील एकमेव जिल्हा नगर होता. मात्र नगर मधील रुग्णवाढ नेमकी कशामुळे झाली, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज खुलासा केला आहे.
वाचाः
जिल्हाधिकारी यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे नगर जिल्हयातील जनतेशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना काही नागरिकांनी नगरची रुग्ण वाढ होत असल्यामुळे लॉकडाउन करण्याचीही मागणी केली. मात्र याबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘खरंतर जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या वाढत नाही, तर आम्ही टेस्टिंग वाढवून रुग्णांचा शोध घेत आहोत. त्यामुळे ही संख्या जास्त दिसत आहे. आह्मी जर आजपासून सलग दहा दिवस टेस्टिंग करणेच बंद केले, तर दहा दिवसानंतर जिल्ह्यातील रुग्ण संख्या शून्य असेल. पण आम्ही तसे अजिबात करणार नाही. उलट करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग आम्ही वाढवणार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचाः
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये. आजही अनेक जण बेफिकिरीने वागताना दिसतात. तोंडाला मास्क लावत नाही. नियम काटेकोर पाळत नाही. पण घराबाहेर पडताना मास्क लावले, सोशल डिस्टंसिंगचे पालन केले, आणि नियम काटेकोरपणे पाळले , तर रुग्ण वाढणार नाही. सध्या प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. मुळात करोना आता सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे लोकांनीच आता जपून वागले पाहिजे. मास्कचा नियमित वापर केला पाहिजे , असेही ते म्हणाले.
नगरमध्ये करोना अनुषंगाने केलेल्या तयारीची देखील द्विवेदी यांनी नागरिकांना माहिती दिली. जिल्ह्यामध्ये करोना अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती केलेली आहे. लॉकडाउन करण्याचा विषय आता संपला असून करोना संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग करून बाधित रुग्णांची विलगीकरण करणे यावर भर देण्यात येत आहे. या काळात नागरिकांचे देखील प्रशासनाला सहकार्य असणे महत्त्वाचे असल्याचे द्विवेदी म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times