कानपूरच्या घाटमपूरमध्ये राहणाऱ्या सर्वेशचा विवाह १७ मार्च २०२२ रोजी झाला. १९ मे रोजी मधुचंद्राच्या रात्रीच्या आधी सर्वेशचा मृतदेह घरापासून २० किलोमीटरवर रेल्वे रुळांच्या शेजारी अर्धनग्न अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र आजपर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही.
या प्रकरणी सर्वेशच्या आई लिलावती मुलाची लग्नपत्रिका घेऊन पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्या. ‘मधुचंद्राच्या रात्रीपूर्वी नवरीच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला, त्यानंतर मेसेजदेखील आला. त्यानंतर माझा मुलगा घरातून निघाला. त्याचा मृतदेह घरापासून २० किलोमीटरवर रेल्वे रुळांच्या शेजारी आढळून आला,’ असं लिलावती म्हणाल्या. ज्या नंबरवरून नवरीला कॉल आला होता, त्यावर आम्ही कॉल करून पाहिला. मात्र कोणीच फोन घेतला नाही. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र आजतागायत त्यांना आरोपींना शोधता आलेलं नाही, असं लिलावतींनी सांगितलं.
सर्वेशच्या हत्येत नवरीचा हात असल्याचा आरोप मुलाकडच्यांनी केला. तिच्याच फोनवर आलेल्या कॉलनंतर सर्वेश घरातून निघाला. मात्र पोलिसांनी अद्याप चौकशी केलेली नाही. मोबाईल नंबरच्या आधारे कोणालाही पकडण्याचा प्रयत्न केलेला नाही, असा दावा सर्वेशच्या कुटुंबीयांनी केला.