मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरातील एका महाविद्यालयाबाहेरील देखील दोन मुलींच्या वादाचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत होता. त्यांनतर आता या शाळकरी मुलींच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलींचा ग्रुप एका मुलीला रायटिंग पॅडने घोळका करून चारही बाजूंनी मारताना दिसत आहे. या मुली इयत्ता दहावीतील असल्याचे समजत आहे. दहावीच्या पेपरच्या दिवशी हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. सातपूर भागातील एका विद्यालयात दहावीचा पेपर सुरु होता. पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले असताना भर रस्त्यात काही विद्यार्थिनींनी एका विद्यार्थिनीला जोरदार चोप दिल्याचे व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.
शाळकरी मुलींनी घोळका घालून या मुलीला मारहाण का केली? त्यामागचे कारण काय आहे? हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु हा व्हिडिओ शहरात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील नाशिकमध्ये अशा प्रकारे महाविद्यालयीन तरुणींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचे समोर आले होते. त्याचे व्हिडिओ देखील जोरात व्हायरल झाले होते.