गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील समियाला गावात १० मार्चला वरातीत फटाके फोडण्यावरुन आणि डीजे वाजवण्याला मनाई केल्यामुळं वाद उफाळला होता. दोन गटात वादावादीनं सुरु झालेल्या संघर्षाचं रुपांतर हिंसाचारात बदललं होतं. या घटनेत १० जण जखमी झाले होते. वडोदरा ग्रामीण पोलिसांनी गावात तगडा बंदोबस्त ठेवला होता. गावातील दोन्ही गटातील २२ आणि १५ जणांना अटक केली होती. हिंसाचारात काही वाहनं देखील पेटवण्यात आली होती. काही घरांचं देखील नुकसान झालं होतं.
आता दोन्ही गटांचा मोठा निर्णय
दोन गटात संघर्ष झाल्यानंतर ३७ जणांना अटक करण्यात आली होती. वादानंतर समियाला गावात शांतता पसरली होती. दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गावातील पोलीस दल कमी करण्याच्या उद्देशानं आणि शांतता कायम ठेवण्याच्या उद्देशानं बैठक घेण्यात आली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही गटाच्या लोकांनी घडलेली घटना दुर्दैवी असून खेद व्यक्त केला. बैठकीत गावात बंधुभाव राखण्यासाठी शांतता कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना जामीन करण्याचा प्रस्ताव दिला. दोन्ही गटांनी त्याचं स्वागत केलं. यानंतर समियाला गावात शांतता निर्माण झाली. आता दोन्ही गटात समझोता झाल्यानंतर पुन्हा शांतता पसरली असून वादावर तोडगा निघाल्यानं ३७ जणांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.